Exodus 23

1खोटी अफवा पसरवू नको; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नको. 2दुष्टाई करण्याकरता पुष्कळ जणांना तू अनुसरू नको, आणि तू पुष्कळ जणांच्या मागे लागून वादात न्याय विपरीत करण्यास बोलू नको. 3एखाद्या गरीब माणसाचा न्याय होताना, त्याची बाजू खरी असल्याशिवाय त्याचा पक्ष घेऊ नको.

4आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्याला वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोडावे. 5तुझ्या शत्रूचे गाढव जास्त ओझ्याखाली दबून पडलेले दिसले तर तू त्याला सोडून जाऊ नको, तू अवश्य त्याच्याबरोबर राहून ते सोडीव.

6तू आपल्या गरीबाच्या वादात त्याचा योग्य न्याय विपरीत होऊ देऊ नका; 7कोणावरही खोटे दोषारोप करु नका; एखाद्या निष्पाप वा निरपराधी ह्यांचा वध करू नको. कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही. 8लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेऊ नको कारण लाच डोळसास आंधळे करते; आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपरीत न्याय करते. 9परक्यांना कधीही छळू नका; कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हाला चांगली माहीती आहे कारण तुम्ही देखील एकेकाळी मिसर देशात परके होता.

10सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर; आणि तिचे उत्पन्न साठीव. 11परंतु सातव्या वर्षी जमीन पडीत राहू दे. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; व राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे व जैतूनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.

12तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर उपऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना ताजेतवाने वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल. 13मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका.

14वर्षातून तीनदा तू माझ्यासाठी उत्सव करून सण पाळ. 15बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.

16शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा सण पाळावा. वर्षाच्या अखेरीस तू आपल्या श्रमाच्या फळांचा संग्रह करिशील तेव्हा संग्रहाचा सण पाळावा. 17वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर यावे.

18तुम्ही यज्ञपशूचे रक्त मला अर्पण करावयाचे वेळी खमीर घातलेल्या भाकरीसोबत अर्पण करु नये; आणि मला अर्पण केलेल्या यज्ञपशूची चरबी दुसऱ्या दिवसापर्यंत राहू देऊ नये. 19आपल्या जमिनीच्या प्रथम उपजातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधांत शिजवू नये.

20पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचविण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे. 21त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, आज्ञा पाळा आणि त्यांच्यामागे चाला; त्याच्याविरुध्द बंड करु नका. कारण तो तुम्हाला क्षमा करणार नाही; कारण त्याच्या ठायी माझे नांव आहे. 22जर तू त्याची वाणी खरोखर ऐकशील व मी सांगतो ते सर्व तुम्ही केले तर मी तुम्हाबरोबर राहीन; मी तुमच्या सर्व शंत्रूचा शत्रू व विरोधकांचा विरोधक होईन.

23देव म्हणाला, माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा नाश करीन. 24परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नये; त्यांची सेवा करू नये, त्यांना जमीनदोस्त करावे; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावे. 25तुम्ही आपला देव परमेश्वर याचीच उपासना करावी; म्हणजे तू त्याच्या अन्नपाण्यास बरकत देईल. मी तुमच्यामधून रोगराई दूर करीन.

26तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणीही वांझ असणार नाही; मी तुम्हाला दीर्घायुषी करीन. 27ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन. 28मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी, व हित्ती ह्याना तुझ्यापुढून पळावयास लावतील. 29मी त्यांना एका वर्षातच घालवून देणार नाही; कारण मी तसे केले तर देश एकदम ओस पडेल आणि मग वनपशूंची वाढ होऊन ते तुम्हाला त्रास देतील.

30तुमची संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन. 31“मी तुम्हाला तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदीपर्यंत मी तुझ्या देशाची सीमा करीन. मी तुम्हाला तेथे राहणाऱ्या लोकांना तुमच्या हाती देईल व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल. 32तू त्याच्याशी किंवा त्यांच्या देवांशी कोणताही करार करू नको. तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापळ्यासारखे अडकविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरूद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरवात कराल.”

33

Copyright information for MarULB